इतिहास कट्टा अंतर्गत दि. ४ ऑक्टोबर २०१५ रोजी दुपारी ४ वाजता मंदार लवाटे यांचे बरोबर पर्वती पाहणे एक वेगळा अनुभव.त्याचे शब्दांकन :
पर्वती पुणेकरांचे आवडते ठिकाण.शहराच्या नैर्ऋत्य दिशेला पर्वती टेकडी आहे. पूर्वी या टेकडीच्या आजूबाजूला सपाट मैदाने होती. पेशवाईत या मैदानात सैन्याचे तळ असत.पर्वती टेकडीची उंची समुद्र सपाटीपासून जवळजवळ २१११ फूट आणि शहराच्या पातळीच्या अनुशंगाने २६० फूट आहे.
१९८० पर्यंत पुणे शहराच्या आसपास दाट झाडी होती.या झाडीमुळे लवकरच अंधार पडत असे. अर्थातच त्या मुळे तेंव्हा सूर्यास्तानंतर पर्वतीवर जाणे सोयीचे नव्हते .हे आजही मला आठवते.
पुण्यातील अनेक लोक दररोज सकाळी त्यांच्या दैनंदिन व्यायामाचा भाग म्हणून,भाविक दररोजचे मंदिरात देवदर्शनासाठी व पुण्यात येणारे पाहुणे पाहण्याचे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून व उंचीवरून दिसणारा सुर्योदय -सुर्यास्त पाहण्यास येथे येतात.
सकाळी ५ ला पर्वती जागी होते आणि संध्याकाळी ८ वाजता बंद होते.
पार्वतीवर एक प्रमुख मोठे व तीन लहान मंदिरे आहेत .मुख्य मंदिर ई.स.२३ एप्रिल १७४९ मध्ये तिसरे पेशवे श्रीमंत नाना साहेब यांनी बांधले. त्यांच्या आई काशीबाई साहेब यांच्या पायाला आवाळू झाले होते. पर्वतीचे पाटील नवलोजी तावरे पाटील यांना देवीने दृष्टांत दिल्यामुळे तावरे पाटील यांनी निवडुंगाच्या बनात सापडलेल्या देवीच्या मूर्तीची पर्वतीवर एका लहानशा मांडवात स्थापना केली होती.त्यांच्या आईचा गंभीर आजार देवीच्या आशीर्वादाने बरा झाला . हे तळ्यातील गणपतीच्या दर्शनास आलेल्या काशीबाईंना त्यांच्या कारभाऱ्याकडून कळले. त्यांनाही देवीची प्रचीती आल्यामुळे त्यांनी नानासाहेबांकडे देवीचे देऊळ बांधण्याची इच्छा प्रकट केली. या इच्छेनुसार नानासाहेबांनी पर्वतीवर पर्वताई देवीचे मंदिर बांधले. पर्वतीवर जाण्याकरीता चिरेबंदी दगडांच्या एकशे तीन पायऱ्या, दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बांधण्यात आल्या. आपल्या येथे उपलब्ध असलेला काळ्या बेसाल्टच्या दगडा मधील या पायऱ्या हे मराठा काळातील घडीव दगडी बांधकामाचे सुरेख उदाहरण आहे. गेले दोनशे हून जास्त वर्षे ऊन , वारा आणि पाऊस यांना तोंड देत या पायऱ्या वापरात आहेत. यांची रुंदी एक हत्ती सहजपणे मंदिराकडे चालत चढत जाऊ शकेल अश्या आहेत.पूर्वी या पायऱ्या आजच्या पायथ्याच्या पुरंदरे वाड्यापाशी संपत असत . प्रिंस ऑफ वेल्स पुण्यात आला असताना त्याचा हत्ती पाय घसरून पडल्यानंतर याचा वापर हत्तीवरून जाण्यास बंद झाला.
या पायऱ्या चढून गेल्यानंतर अर्ध्या अंतरावर डाव्या बाजूस चौथऱ्यावर सतीचे स्मारक दृष्टीस पडते. येथे सतीची पावले कोरलेली आहेत. पुण्याच्या इतिहासात इ.स. १८३२ मध्ये सर्वात शेवटी सती गेलेल्या,पर्वतीवरील पुजारी दीक्षित यांच्या पत्नीची ती समाधी आहे. पुढे शहात्तराव्या पायरीजवळ तालमीची जागा होती. तेथे पेशव्यांच्या तोफा ठेवीत असत. या तोफा एकादशी व सणाच्या दिवशी उडवीत असत. इ.स.१८७९ मध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावानंतर, इंग्रज सरकारने या तोफा तेथूनहलविल्या.
पर्वतीवर गेल्यानंतर उजव्या बाजूस नगारखान्याची इमारत आहे. या इमारतीच्या तटबंदीच्या भिंती अर्ध्या चिरेबंदी असून वरच्या बाजूस विटांचे बांधकाम आहे. इंग्रजी अमदानीमध्ये पर्वती संस्थानचे कारभारी माधवराव सदावर्ते यांनी नगारखान्याच्या इमारतीचे बांधकाम केले. येथील प्रवेशद्वारातून आत गेल्यावर देवदेवश्वर मंदिराचे प्रशस्त फरसबंदी केलेले आवार आहे. या आवाराभोवती असलेल्या तटामध्ये कमानी असलेल्या महिरपी ओवऱ्या आहेत. देवदेवेश्वर मंदिराचे बांधकाम इ.स. १७४४ ते १७९१ या कालावधीत झाले. येथील मंदिरातील मूर्तींची स्थापना इ.स. १७४९ मध्ये करण्यात आली. या देवालयाचा तट अष्टकोनी असून दुमजली आहे. पूर्वेकडील भागातील तीन खिडक्यांना गोखला असे म्हणतात. येथे गुरव सकाळ-संध्याकाळवाजंत्री वाजवत असत. येथील गच्चीवरून दुसऱ्या बाजीरावाने खडकी येथील इंग्रज-मराठा. युद्धाची धुमश्चक्री दुर्बिणीतून पाहिल्याची नोंद मिळते.
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. पानिपताच्या तिसर्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले.मुख्य मंदिर मराठा शैलीत बांधलेले पंचायतन पद्धतीचे आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय),गणेश(नैऋत्य),अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.इ स १७६६ मध्ये माधवरावांनी हे शिव पंचायतन विकसित केले,ज्याच्यात हि चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो.मंदिरात तीन धातूच्या मूर्ती आहेत.भगवान शंकर,पार्वती आणि गणेश या त्या तीन मूर्ती.१७४९ मध्ये या मूर्ती सोन्यामध्ये बनवल्या होत्या १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्यामुळे त्याजागी चांदीमधिल हुबेहूब दुसऱ्या मूर्ती ठेवल्या गेल्या.मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे.महाराष्ट्रातील प्रथेप्रमाणे तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.
देवदेवेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूस दिसतात भैरव १९८१ मध्ये त्यांची स्थापना केली गेली . दोन्ही बाजूच्या देवड्या मधून आपण प्रांगणात प्रवेश करतो. इथे प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सुपारीच्या गणेशाऐवजी जयपूरहून आणलेल्या संगमरवरी मूर्तीची नानासाहेब पेशव्यांनी स्थापना केली .
मुख्य मंदिर पूर्वाभिमुख असून गंडकी शिळेतील बनवलेले शिवलिंग दक्षिणोत्तर आहे. या शिवलिंगाच्या मागील भिंतीला , ६ इंच उंचीच्या पार्वती व गणेशाला मांडीवर घेतलेल्या शंकराची मूर्ती आहे.पेशव्यांनी चांदीचा शिव व सोन्यातील पार्वती व गणेश केले होते. १९२९ साली त्यांची चोरी झाली व त्याजागी पितळेच्या मूर्ती बसवण्यात आली .
निझामाच्या माधवराव पेशवे असतानाच्या व यशवंतराव होळकर यांच्या १८१७ मध्ये पुण्यावर केलेल्या हल्ल्याच्यावेळी या मूर्ती सिहगडावर हलवण्यात आल्या होत्या.
षडानन कार्तिकेयाचे ज्याला दक्षिण भारतीय सुब्रमण्यम किंवा मुरुगन म्हणून ओळखतात त्याचे मंदिर
राघोबादादा पेशव्यांनी बांधलेल्या या मंदिरातील मूर्ती निझामाच्या स्वारीच्या वेळी भंगली गेल्याने माधवराव पेशव्यांनी नाना फडणविसांच्यांकरवी १४ मार्च १७६७ ला पुन:प्रतिष्ठा केली. १७९१ मध्ये वीज पडल्याने व १८६७ मध्ये उजवा हात भंग झाल्याने पुन्हा एकदा मूर्तीची पुन:प्रतिष्ठा केली गेली.
![]() |
| कार्तीकेय |
परंपरेने महाराष्ट्रात महिलांना कार्तिकेय दर्शनाची परवानगी देण्यात येत नाही.
कार्तिकेय मंदिराच्या दक्षिण दिशेने श्री विष्णू मंदिर आहे. हेदेवदेवेश्वर मंदिरा सोबत बांधण्यात आले.मूर्ती 4.5 फूट उंचीची गंडकीच्या गडद काळ्या दगडात केली आहे. हि मूर्ती माधव मूर्ती म्हणून ओळखली जाते व घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने शंख चक्र गदा व पद्म या वस्तू त्या मूर्तीच्या हातात दिसतात . आपल्या प्रशासन कौशल्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या माधवराव पेशवे यांनी तिची प्रतिष्ठापना केली . हि मूर्ती श्रीयंत्रावर उभी आहे .वैजयंती हार ,यज्ञोपवित व अलंकारांनि युक्त विष्णूमूर्ती समोर विष्णू वाहन अश्या गरुडा-देवाचे लहान मंदिर आहे.
रमणा ते डेक्कन कॉलेज
रमणा हि चार बाजूला दरवाज्यांनीयुक्त बंदिस्त कुंपण घातलेली जागा होती 'रमणा' या शब्दाचे मूळ राम म्हणजे आनंद किंवा आनंदी असणे यात आहे. जेथे माणूस आनंदी होतो अशी जागा.१७५० ते १८१० दरम्यान, या ठिकाणी वैदिक प्रशिक्षण घेतलेल्या वा विशेषतः शिकलात ब्राह्मणांची पेशवे स्वतः ,त्यांचे भाऊ वा मुख्य न्यायाधीशराम शास्त्री प्रभुणे परीक्षा घेत.
दुसऱ्या बाजीरावास बिठूरला पेन्शनवर पाठविल्यावर पूर्वीच्या पेशवाईचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे कमिशनर म्हणून काम पाहू लागले.
पेशवे विद्वान ब्राह्मणांना त्यांच्या योग्यतेनुसार दक्षिणा वाटण्यासाठी प्रतिवर्षी पाच लाख रुपये खर्च करीत. ही प्रथा खंडेराव दाभाडे यांची होती. तळेगाव येथे ते अशा दक्षिणा वाटीत. १७३० मध्ये दाभाडय़ांचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने पुण्यात ही प्रथा सुरू केली. १८१८ त पेशवाई बुडाल्यानंतर पेशवे दरबारचा रेसिडेन्स व मुंबईचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ही प्रथा लगेच बंद केली नाही. त्यासाठी ‘दक्षिणा प्राईज कमिटी’ स्थापन केली. १८२१ साली दक्षिणेसाठी राखून ठेवलेल्या फंडातून ‘पूना संस्कृत कॉलेज’ची स्थापना झाली. त्याचा फायदा फक्त ब्राह्मणांनाच होत होता. या वर्गाला खूश ठेवण्याचे धोरणही त्यामागे होते.
१८४० साली ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ स्थापन झाले. १८४९ साली संस्कृतचे शिक्षण बंद करावे असा प्रस्ताव बोर्डाने मांडला. त्याला विरोध करून जगन्नाथ शंकरशेठ यांनी संस्कृतची जोरदार कैफियत सादर केली. त्यामुळे १८५० पासून संस्कृत व इंग्लिश या दोन्ही विषयांना अभ्यासक्रमात स्थान मिळाले.
१८४० साली ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ स्थापन झाले. १८४९ साली संस्कृतचे शिक्षण बंद करावे असा प्रस्ताव बोर्डाने मांडला. त्याला विरोध करून जगन्नाथ शंकरशेठ यांनी संस्कृतची जोरदार कैफियत सादर केली. त्यामुळे १८५० पासून संस्कृत व इंग्लिश या दोन्ही विषयांना अभ्यासक्रमात स्थान मिळाले.
संस्कृत ही ब्राह्मणांची मक्तेदारी राहिली नाही. आता ‘पूना संस्कृत कॉलेज’ चालविणे शक्य नव्हते. म्हणून त्यांना इंग्लिश शिक्षणाची जोड देऊन १८५१ मध्ये ‘पूना अंडरग्रॅज्युएटकॉलेज’ची स्थापना झाली. याच कॉलेजला पुढे ‘डेक्कन कॉलेज’ हे नाव पडले, असा संदिग्ध उल्लेख पुस्तकांतून मिळतो.
डेक्कन हा शब्द दक्षिण- दख्खन- डेक्कन असा निर्माण झाला. तो दक्षिण भारताचा विशिष्ट भौगोलिक भाग सूचित करतो.
पण कॉलेजला ते नाव का पडले? कदाचित ‘दक्षिणा प्राईज कमिटी’च्या फंडातून जन्मलेले असल्यामुळे अन्य अर्थाने (दक्षिणा- डेक्कन) प्रचलित डेक्कन शब्द त्याला चिकटला असावा. पुढे टिळक-आगरकरांमुळे तो वलयांकित बनला.
१९३४ साली हे जुने डेक्कन कॉलेज बंद पडले. पण त्याच ऐतिहासिक संकुलात १९३९ साली ‘डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट’ नवा अवतार धारण करून उभी राहिली. तरी तिला डेक्कन कॉलेज हीच ओळख पुरेशी ठरते कारण हे दोन वजनदार शब्द टिळक-आगरकरांपासूनचा वारसा सांगतात.










